PM किसान सन्मान निधी: केंद्र सरकार हप्ता १२ हजार करणार? पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM-Kisan) वार्षिक हप्ता ६,००० रुपयांवरून १२,००० रुपये करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण दिले आहे. राज्यसभा खासदार समीरु इस्लाम यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी स्पष्ट केले की, पीएम किसानचा हप्ता वाढवून १२,००० रुपये करण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नाही.
शेतकऱ्यांकडून आणि काही तज्ज्ञांकडून गेल्या चार-पाच वर्षांपासून हा हप्ता वाढवण्याची मागणी केली जात आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान, शेतीमालाला मिळणारा कमी भाव आणि वाढती महागाई या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मिळणारी वार्षिक ६,००० रुपयांची मदत अपुरी ठरत आहे. संसदेच्या स्थायी समितीनेही डिसेंबर २०२४ मध्ये सादर केलेल्या अहवालात ही रक्कम वाढवण्याची शिफारस केली होती, परंतु सरकारने ही मागणी तूर्तास फेटाळून लावली आहे.



















